मतदार नोंदणीकरिता आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद

 

जिल्हाधिकाऱ्यांची कँटोन्मेंट मतदार संघाला भेट

पुणे : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे कॅन्टोमेंन्ट मतदार संघातील सेंट मिराज हायस्कूल येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीत नवमतदारांची नोंदणी करण्यात आली.

जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात ४ व रविवार ५ नोव्हेंबर आणि २५ व २६ नोव्हेंबर या शनिवार व रविवारच्या शासकीय सुट्टीच्या दिवशी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आज सर्व मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) उपस्थित राहून मतदार नोंदणी, वगळणी, नोंदीच्या तपशीलातील बदल आदींचे नागरिकांचे, नवमतदारांचे अर्ज स्वीकारले.

ठिकठिकाणी संबंधित मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन बीएलओच्या कामाची पाहणी करून मार्गदर्शन केले.

पुणे कँटोन्मेट मतदार संघाला भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी नवमतदारांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी एसएसपीएमएस केंद्रालाही भेट देऊन मतदार नोंदणीविषयी माहिती घेतली व मार्गदर्शन केले.