गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक संपन्न

 

मुंबई : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक  पुणे येथील सहसंचालक कार्यालयात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झाली. ही बैठक जे.जे. रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोगशास्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास कुरुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीस कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे, आरोग्य सेवेच्या सह संचालक डॉ. बबिता कमलापूरकर, आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक राजश्री ढवळे, विधी व न्याय विभागाच्या उपसचिव सुप्रिया धावरे, समिती सदस्य डॉ. पायल पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. कमलापूरकर यांनी राज्यातील कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला. सर्व जिल्ह्यांमध्ये, महानगरांमध्ये व तालुका स्तरावरही समिती स्थापन झाल्याची माहितीही डॉ. कमलापूरकर यांनी  दिली. तसेच राज्यात एकूण ११ हजार ५०२ सोनोग्राफी केंद्र असल्याचेही त्यांनी  सांगितले.

प्रसूतीपूर्व लिंग निदान याबाबत नागरिकांना  १८००-२३३-४४७५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करता येते. या तक्रारीनंतर संबंधित केंद्रावर खटला दाखल झाल्यानंतर तक्रारदारास एक लाख रुपयाचे बक्षीस देणारी योजनाही सुरू आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.