मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 


मुंबई : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून मताधिकार बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यानी केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात होण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण महत्त्वपूर्ण असते. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविला जाणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच २०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्याच्या १ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही ही कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल. मात्र, त्या अर्जावरील प्रक्रिया सदर तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. २०२४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी.

प्रारुप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारानी खात्री करणे आवश्यक आहे. बहुतांशवेळी मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच नाव, पत्ता, लिंग, जन्म दिनांक, वय, ओळखपत्र क्रमाक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील, त्यांनी अर्ज क्रमांक  आठ भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. त्याप्रमाणे एखाद्याच्या नावांसंबधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये तथ्य आढळून आले, तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी, अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्याच्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ व १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती याच्यासाठी विशेष शिबिरे राबविली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळांचे  सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणी शिबिरासाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.  दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, त्याची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी २ व ३ डिसेंबर या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने या समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्या अंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी वास्तव्यास आलेले नागरिकांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नाव, मृत व्यक्ती गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रियांच्या नावाची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

५ जानेवारी २०२३ च्या रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या नऊ कोटी दोन लाख चौसष्ठ हजार आठशे चौऱ्याहत्तर (९,०२,६४,८७४) इतकी होती. ही मतदारसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७१.४५ टक्के इतकी होती. त्यानंतर झालेल्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आता २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारसंख्या नऊ कोटी आठ लाख बत्तीस हजार दोनशे त्रेसष्ट (९,०८,३२,२६३) एवढी आहे, आणि ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७१.४१ इतकी आहे. यामध्ये सतरा लाख तीन हजार एकशे (१७.०३.१९३) इतकी नवीन मतदार नोंदणी आहे, तर अकरा लाख पत्तीस हजार आठशे चार (११,३५,८०४) एवढ्या मतदाराची नावे वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेली ही नावे दुबार, मृत कायमस्वरूपी स्थलांतरित या मतदाराची होती.

तसेच २०२३च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारसंख्या चार कोटी एकाहत्तर लाख सव्वीस हजार पाचशे दोन (४,७१,२६,५०२ ) इतकी होती, तर २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या चार कोटी त्र्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार सहाशे चौसष्ठ (४,७३,६९,६६४) एवढी आहे, तर स्त्री मतदारांची जानेवारी २०२३ मधील संख्या चार कोटी एकतीस लाख तेहतीस हजार सहाशे पंचावन्न (४,३१,३३,६५५) इतकी आहे. ऑक्टोबर २०२३ मधील संख्या चार कोटी चौतीस लाख सतावन्न हजार सहाशे एकोणऐशी (४,३४,५७,६७९) एवढी आहे. जानेवारी २०२३ मधील यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ९१५ स्त्रिया होत्या, तर यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९१७ स्त्रिया आहेत. तृतीयपंथी समुदायाची जानेवारी २०२३ मधील संख्या चार हजार सातशे सतरा (४७१७) होती, तर ऑक्टोबर २०२३ मध्ये चार हजार नऊशे वीस (४९२०) इतकी आहे.

राज्याच्या लोकसंख्येत १८-१९ वर्षे वयोगटाची टक्केवारी ३.७६ (४७.८३.०७०) इतकी आहे. ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त ०.२७ (३.४८.६९१ ) एवढी आहे, तर २०-२९ या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी २०.३८ (२,५९,२९,२०६ ) इतकी आहे. ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी १२.१९ (१,५५,११,३७६) एवढी आहे. मतदार यादीतील तरुणांची आकडेवारी वाढवण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा’चे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.