वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय इथं दिनांक २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘वन्यजीव सप्ताहाचं’ आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि  प्राणिसंग्रहालय इथं  दिनांक २ ते ८ ऑक्टोबर  दरम्यान ‘वन्यजीव सप्ताह’ साजरा केला जात आहे.  या सप्ताहाचे औचित्य साधून उद्या ४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता भायखळा इथल्या  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आण्णा भाऊ साठे नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचं  आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये  सकाळी ८ ते १० या वेळेत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि खासगी शाळांमधील इयत्ता ८ आणि  ९ वीच्या एक हजार विद्यार्थ्यांसाठी ‘मी आणि  राणीबाग’  आणि  ‘स्वच्छता ही सेवा’  यापैकी एका विषयावर चित्रकला स्पर्धेचं आयोजन या उद्यानात करण्यात आलं  आहे. तसंच  अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते  ‘Educational Activities by Zoo’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत वनस्पती उद्यान आणि  प्राणिसंग्रहालय इथं  जागतिक प्राणिपाल दिनाचा कार्यक्रम होणार आहे.राज्याचे शालेय शिक्षण आणि  मराठी भाषा मंत्री तसंच  मुंबईचे  पालकमंत्री  दीपक केसरकर,  त्याच बरोबर कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री आणि  मुंबई उपनगरचे  पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.