अमृत कलश यात्रेच्या सांगता समारंभानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचं उद्दिष्ट असून त्यासाठी प्रत्येक भारतवासीयाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. एकविसाव्या शतकात राष्ट्र उभारणीसाठी देशातली युवाशक्ती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं ते म्हणाले. मेरी माटी-मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेचा सांगता समारंभ आज नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर झाला. त्या समारंभात प्रधानमंत्री बोलत होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचाही आज समारोप झाला. अमृत महोत्सव काळातच भारत जगातली पाचव्या क्रमांकाची आर्थिक सत्ता बनला असं ते म्हणाले. युवकांसाठीच्या माय भारत उपक्रम संकेतस्थळाचं उद्घाटन त्यांनी केली. मेरी माटी-मेरा देश हे अभियान म्हणजे राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान करणारे वीर आणि वीरांगना यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचं उद्घाटन झालं. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अमृत कलश यात्रेकरूंना त्यांनी मार्गदर्शन केलं. देशभरातल्या युवावर्गासाठी मेरा युवा भारत मंचाचा प्रारंभही प्रधानमंत्र्यानी केला.