सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली असून १०२ पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. उत्तर सिक्कीममधल्या लोनाक तलाव परिसरात  काल ढगफुटी झाली. त्यामुळे  लाचेन खोऱ्यातल्या  तीस्ता नदीला अचानक पूर आला. या ठिकाणी NDRF, अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, गोहाटी आणि पाटणा इथून आणखी दोन तुकड्या निघाल्या आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे. चुंगथांग, लाचेन आणि लाचुंग इथल्या पूरग्रस्त भागाला विमानामधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.  

या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.  सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याशी  काल संवाद साधून त्यांनी पूरस्थितीचा  आढावा घेतला.