भारतीय मोबाईल काँग्रेसच्या ७ व्या आवृत्तीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 




नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्स- जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्याच्या दिशेनं सरकार प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय मोबाईल काँग्रेसच्या ७ व्या आवृत्तीचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, तेव्हा ते बोलत होते. मोबाईल ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत ११८ व्या क्रमांकावरून ४३ व्या स्थानावर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत ५ जी कनेक्टिव्हीटी आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. देशात ५ जी तंत्रज्ञान सुरु झाल्यापासून चार लाख ५ जी स्थानकं उभारण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. ५ जी तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी शंभर ५जी प्रयोगशाळा प्रधानमंत्र्यांनी देशभरातल्या शैक्षणिक संस्थांना प्रदान केल्या. ५ जी तंत्रज्ञानाशी निगडित संधींना चालना देण्यासाठी या प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. देशात सिक्स जी साठी शिक्षण आणि स्टार्ट-अप इकोसिस्टम तयार करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. गेल्या दहा वर्षांत प्रधानमंत्री मोदींनी दूरसंचार क्षेत्राचा कायापालट केला असल्याचं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी म्हटलं.