वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार हरी भक्त परायण बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. नेरूळ इथं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नेरुळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून उद्या संध्याकाळी चार वाजता नेरुळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाबामहाराज सातारकर याचं पूर्ण नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे- सातारकर असं होतं. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातला प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचं नाव घेतलं जात असे. १९६२  पासून बाबामहाराजांनी कीर्तन आणि प्रवचन करायला सुरवात केली. गोड गळा, रसाळ वाणी आणि गाढा व्यासंग ही त्यांच्या कथन शैलीची वैशिष्ट्यं होती.

वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान साध्या सोप्या शब्दात सांगण्याची त्यांची हातोटी लोकप्रिय ठरली. १९८३ साली त्यांनी 'श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था' स्थापना केली. तसंच व्यसनमुक्तीची चळवळ चालवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी सातारकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.