पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे.  यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. यापूर्वी २०१८ मध्ये इंडोनेशियात झालेल्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी ७२ पदकं मिळवली होती. भारतीय खेळाडूंनी आज ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य अशा १८ पदकांची कमाई केली.

कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत शितल देवीनं आज सुवर्ण पदक मिळवलं. बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत नितेश कुमार आणि तरुण यांच्या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. तर पुरुष एकेरीत सुहास यथीराज, प्रमोद भगत यांनी  सुवर्णपदक आणि नितेश कुमारनं रौप्य पदक जिंकलं. तसंच महिला एकेरीत थुलसीमथी यांनीही सुवर्ण पदक पटकावलं.

पंधराशे मीटर धावण्यात रमन शर्मा यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. थाळीफेकीत देवेंद्र कुमार यांनी आज सुवर्ण पदक जिंकलं. लांब उडीत धर्मराज सोलाईराज यांनी सुवर्णपदक पटकावलं. 

जलतरणात ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुयश जाधवनं कांस्यपदक पटकावलं.

या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंची प्रशंसा केली आहे.