अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांची घोषणा

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच त्यांच्या आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. त्या आज मुंबईत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होत्या. लवकरच सुमारे ३ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पदोन्नत्तीचा मार्ग मोकळा करुन देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यात नमो महिला सशक्तीकरण अभियान लवकर सुरू केलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या माध्यमातून सुमारे दोन कोटी महिलांचं सक्षमीकरण केलं जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून बचतगटांच्या सक्षमीकरणावरही भर दिला जाईल, तसंच गटाच्या उत्पादनांचं विपणन आणि विक्री यासाठीही सरकार मदत करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पुढील दोन दिवसांतच भाऊबीज भेटीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. आशा सेविकांच्या मानधनात वाढ आणि मोबाईल देण्याच्या प्रश्नावरही लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.