मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरला दिली भेट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईतल्या गोरेगाव इथल्या  एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. तसेच जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली आणि उन्नत नगर, गोरेगाव इथल्या  जय भवानी एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस केली. या घटनेची सखोल चौकशी करून  पुढील कारवाई करण्यात येणार असल्यांचं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलं. एसआरए सारख्या इमारतींचे फायर ऑडिट त्वरीत करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  बृहन्मुंबई महानगरपालिकेनं  दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव इथं लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून ४० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीच्या टेरेस आणि वेगवेगळ्या मजल्यांवरील सुमारे ३० रहिवाशांची सुटका करण्यात आली आहे.