रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पत धोरण विषयक समितीने एकमतानं घेतल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रेपोदर पूर्वीप्रमाणेच साडे सहा टक्क्क्यांवर कायम राहिल. इतर व्याजदरातही बदल झालेला नाही. गेल्या ३ आढाव्यांमधेही व्याजदर बदलले नव्हते.

जुलै महिन्यात टोमॅटो आणि इतर भाज्यांचे दर वाढल्याने चलन फुगवटा निर्देशांकात वाढ झाली. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर मधे दरवाढ निवळली. या दोन महिन्यात अन्न आणि इंधन वगळता इतर उत्पादनांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकात घट झाली असल्याचं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे. मात्र यंदाच्या खरीप हंगामात पाऊस काहीसा कमी झाल्यामुळे कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनांवर मंदीचं सावट आहे तसंच जागतिक स्तरावर अन्न आणि इंधनाच्या दरात सतत चढ-उतार होत असून त्याचाही परिणाम देशातल्या महागाई निर्देशांकावर होऊ शकता.

२०२३-२४ या वर्षासाठी रिझर्व बँकेनं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ६ पूर्णांक ६ दशांश टक्के राहील, असाही अंदाज रिझर्व बँकेनं वर्तवला आहे. 

वैयक्तिक हमीवर घेतलेल्या जाणाऱ्या कर्जाबाबत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बँका आणि बँकां खेरीजच्या वित्तीय कंपन्यांनी ही कर्ज देताना जोखमीच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी, असं दास यांनी सांगितलं.