राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): राजस्थानमधल्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे एका ट्रेलरनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या दुर्घटनेत अकरा जण ठार आणि १५ जण जखमी झाले. ही बस गुजरातहून उत्तर प्रदेशात मथुरा इथं जात असताना पहाटे साडेचारच्या सुमाराला हा अपघात झाला. लखनपूर परिसरातल्या अंतरा उड्डाणपुलावर बस थांबली असता पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरनं धडक दिली. पाच पुरुष आणि सहा महिलांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवासी भावनगर जिल्ह्यातल्या दिहोरचे आहेत. जखमींना भरतपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीकडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.राजस्थानमधल्या भरतपूर इथं आज पहाटे झालेल्या दुर्घटनेतल्या भाविकांच्या मृत्यूबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींना लवकरात लवकर बरे होवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.