NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा केंद्र सरकारचा आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यात शुल्का संबंधी केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर नाफेड आणि NCCF ला प्रत्येकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा आदेश केंद्र सरकारनं दिला आहे. त्यानंतर नाशिक विभागातील  एकूण 13 केंद्रावर गेल्या दोन दिवसांत 1 हजार 340 मेट्रीक टन कांदा खरेदी केल्याची माहिती NCCF चे अध्यक्ष विशाल सिंग यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

कांदा खरेदीची माहिती देताना सिंग यांनी सांगितलं की, यंदा प्रथमच एनसीसीएफनं  कांद्याची खरेदी केली आहे. केंद्र सरकारनं एनसीसीएफला पाच लाख मेट्रिक टनचं उद्दिष्ट दिलं आहे. त्यापैकी तीन लाख मेट्रिक टन खरेदी यापूर्वीच झाली आहे. उर्वरित दोन लाख मेट्रिक टनपैकी एक लाख मॅट्रिक टनाची खरेदी एनसीसीएफनं सुरू केली आहे. 

कांदा खरेदी बरोबर एनसीसीएफ दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आसामसह विविध राज्यांत कांद्याचा पुरवठा करत असल्याची माहिती सिंह यांनी दिली. आतापर्यंत एकूण 2 हजार 700 मॅट्रिक टन कांदा इतर राज्यांत पाठवल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.