मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात बारा हजारांहून अधिक रुग्णांना १०० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली…श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता मिळालेल्या राज्यातील सुमारे १२ हजार ५०० रुग्णांची अशीच प्रतिक्रिया असणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत या वर्षभरात १०० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. हा एक अनोखा विक्रम असून त्याबद्दल निधी कक्षाच्या टीमचे कौतुक करतानाच गरजू रुग्णांच्या मदतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. विधानभवनातील मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या दालनात धर्मा सोनवणे यांना एक लाख रुपयांच्या वैद्यकीय मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. हे तेच धर्मा सोनवणे आहेत ज्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईकडून ठाण्याला परतत असताना रस्त्याच्या कडेला एक रुग्णवाहिका उभी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ताफा थांबवून रुग्णाची विचारपूस केली..त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. मुख्यमंत्र्यांनी तेव्हा श्री. सोनवणे यांना केवळ रुग्णवाहिकाच दिली नव्हती तर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारदेखील केले होते. या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आला त्याचाच एक लाखांचा धनादेश काल श्री. सोनवणे यांना देण्यात आला. त्यावेळी मला तुमच्यामुळे नवं आयुष्य मिळाल्याची भावना सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली.
श्री. सोनवणे यांच्या चेहऱ्यावर दिसलेले कृतज्ञतेचे भाव हेच अलौकिक समाधान देऊन गेल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देतानादेखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे कौतुक केले होते. गरजूंना मदत देताना प्रसंगी सोपस्कार होत राहतील परंतु त्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे अशी भावना देखील व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने गेल्या वर्षभरात १०० कोटींची मदत वितरित करण्याचा टप्पा सर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या कक्षाचे कौतुक केले. या कक्षाने केलेले अथक परिश्रम आणि रुग्णसेवेसाठी दाखवलेली तत्परता यामुळे हे साध्य झाल्याचे सांगत भविष्यातही गरजू रुग्णांना अशाच प्रकारे मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, निलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या टीममध्ये काम करणारे सर्व वैद्यकीय सहाय्यक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या कक्षाचा वैद्यकीय मदतीचा आलेख कायम चढता राहिला असून यापूर्वी ५० तर आता १०० कोटी वैद्यकीय मदत देण्याचा टप्पा सर केल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णासाठी हा निधी कक्ष हा एक आशेचा किरण ठरला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.