सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या, देशातल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. हा रोजगार मेळावा देशातल्या ४५ ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला असून गृह विभागाच्या केंद्रिय सुरक्षा दल, अंमली पदार्थ विरोधी दल आणि दिल्ली पोलिस, या विभागांमधे या नियुक्त्या केल्या आहेत.  त्याबद्दल या उमेदवारांचं प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं. हे सर्वजण अमृत काळात भारतीय जनतेचे अमृतरक्षक बनतील असं ते म्हणाले. युवकांना नव्या संधी खुल्या करण्यासाठी निमलष्करी दलांच्या भर्ती प्रक्रियेत अनेक बदल केले आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितलं.

भारत ही सध्या सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून, या दशकातचं ती जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. स्वयंचलित वाहन, औषध निर्मिती ही क्षेत्रं अत्यंत झपाट्यानं वाढत आहेत. आगामी काळात या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारताची अन्नप्रक्रिया बाजारेपेठ २६ लाख कोटी रूपयांची असून, येत्या ३ वर्षांत ती ३५ लाख कोटी रूपयांवर जाईल. पर्यटन क्षेत्र २०३० पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत २० लाख कोटी रूपयांचं योगदान देईल आणि १३ ते १४ कोटी नवे रोजगार निर्माण करेल, असं प्रधानमंत्र्यांनी संगितलं. व्होकल फॉर लोकल हा मंत्र जपत, भारतातच तयार झालेले लॅपटॉप, कॉम्प्यूटर्स खरेदी करण्यावर सरकारचा भर आहे, त्यामुळं कारखानदारीला आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असं ते म्हणाले.  भारताची निर्यात लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या नऊ वर्षांत देशातलं उद्योग क्षेत्र चांगली कामगिरी करत असल्याचं यावरुन दिसून येत, असं प्रधानमंत्र्यांनी सागितलं. सरकारनं नऊ वर्षांपूर्वी जन धन योजना सुरु केली. त्याअंतर्गत ५० कोटी पेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली. याचा आर्थिक लाभ होत असतानाच, विशेषतः ग्रामीण भागात रोजगार निर्मित करण्यात या योजनेनं महत्तवाची भूमिका बजावली, असं ते म्हणाले. 

नागपुरात हिंगणा स्थित केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मेन्स क्लब ग्रुप सेंटर इथं आयोजित रोजगार मेळाव्यात सुमारे २५० उमेदवारांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं देण्यात आली. तर, पुण्याजळ तळेगाव इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या केंद्रावर आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळाव्यात एकंदर २७१ जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रं प्रदान करण्यात आली. विकसित भारताचं अंतिम उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रत्येकाने आपलं कर्तव्य आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचं आवाहन डॉ . कराड यांनी यावेळी केलं.