विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आज केली. त्यानंतर सर्वपक्षीय गटनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वडेट्टीवार यांना आसनस्थ केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. बेधडक स्वभावाचे विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती खरे तर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच अपेक्षित होती असं मुख्यमंत्री म्हणाले. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एका रथाची दोन चाके आहेत, सक्षम लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेते पद आवश्यक असते. आवश्यक त्यावेळी त्यांच्याकडून टीका आणि सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुक करणं अपेक्षित आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मूळ शिवसैनिक असलेल्या वडेट्टीवार यांची कामाची पद्धत आक्रमकच असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचं अभिनंदन केलं.