मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचं आंदोलन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी नुकतंच पुन्हा आंदोलन केलं. याच महामार्गाचे ठेकेदार पळून का जातात हा संशोधनाचा विषय आहे असं सांगत या पत्रकारांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत या महामार्गाची एक मार्गिका सुरु करण्याची मागणी केली आहे. मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम 2011 मध्ये सुरू झालं, त्यानंतर बारा वर्ष उलटूनही हे काम पूर्ण झालेलं नाही. आजमितीला पहिल्या टप्प्यात पनवेल ते पेणपर्यंत काम झालेलं आहे. पेन ते माणगाव या टप्प्यात 90 टक्के काम राहिलेलं आहे. माणगाव ते पोलादपूर हे काम 90 टक्के झालेलं आहे. कशेडी बोगद्याच काम अजून अर्धवट आहे. एनएच 66 अशी ओळख असलेल्या या महामार्गावरील खड्डयांमध्ये पेण ते नागोठणे मार्गावर असंख्य ठिकाणी पाणी साठत असतं. त्यातून जड वाहनं जाऊन ते खड्डे मोठे होऊन जीवघेणे बनतात. रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी नुकतंच पुन्हा रस्त्यावर उतरून हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं. कोकणातील प्रत्येक तालुक्यात तहसिलदारांना निवेदनं पाठवली आणि लोकप्रतिनिधींना हजारो संदेश पाठविले आहेत. गणेशोत्सवापूर्वी या महामार्गावरील खड्डे भरले जावेत अशी अपेक्षा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी व्यक्त केली आहे.