सरकार मणिपूरचं विभाजन करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकारनं काही ऐतिहासिक निर्णय घेऊन घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला आहे, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दुसऱ्या दिवशी चर्चेत भाग घेताना ते बोलत होते. सत्तेचं रक्षण करणं हे युपीएचं एकमेव लक्ष आहे, तर एनडीए तत्त्वांचं रक्षण करण्यासाठी लढत असल्याचा आरोप त्यांनी केला. एनडीए सरकार फक्त कर्जमाफी करण्यावर विश्वास ठेवत नाही, तर एखाद्याला कर्ज घ्यावंच लागणार नाही,अशी व्यवस्था बनवण्यावर विश्वास ठेवतं, असंही ते म्हणाले. केंद्रानं शेतकऱ्यांना मोफत सुविधा दिल्या नसून, त्याऐवजी शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवलं आहे. यावर त्यांनी भर दिला. 

सरकार मणिपूरचं विभाजन करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत बोलताना केला. त्यांनी सरकारवर आणि सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडलं. मणिपूरमधल्या मदत शिबिराला दिलेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की मणिपूरमधे हिंसाचाराच्या काळात महिलांना अत्याचाराला सामोरं जावं लागलं. परिस्थिती गंभीर असताना ती पूर्ववत करण्यासाठी सरकार मणिपूरमध्ये लष्कर का तैनात करत नाही, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत मणिपूरला का भेट दिली नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. भाजपा देशहिताच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी बोलत असताना सभागृहात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. चर्चेत हस्तक्षेप करत महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याचं विभाजन झालं नाही, आणि कधीही होणार नाही. मात्र मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी असूनही काँग्रेसनं सभागृहात चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप इराणी यांनी केला. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये महिलांवर अत्याचार होत असताना काँग्रेस मूक प्रेक्षक असल्याचा आरोपही त्यांनी केला.