चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे, तर युनायटेड किंगडमच्या अंतराळ संस्थेनं भारतानं आज इतिहास रचला असल्याचं म्हटलं आहे. चंद्रावर अलगद उतरण्यासाठी भारतानं नव्या तंत्रज्ञानाचं दर्शन घडवलं असं सांगत युरोपियन स्पेस एजन्सिचे महासंचालक जोसेफ अश्बाशेर यांनी कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी भारताचं अभिनंदन केलं असून, ब्रिक्स परिवार म्हणून आम्हाला या क्षणाचा प्रचंड अभिमान वाटतो, असं म्हटलं आहे. तर विज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञानातली ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं नेपाळचे प्रधानमंत्री पुष्पकमल दहल यांनी म्हटलं आहे. 

हा भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आणि मानवजातीसाठी महत्त्वाचा क्षण असल्याचं ब्रिटनचे भारतातले उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी म्हटलं आहे, तर चांद्रयान-३ चं चंद्रावरचं अवतरण प्रेरणादायी असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख एन्रिको पालेर्मो यांनी म्हटलं आहे. मालदीवनंही भारताचं अभिनंदन केलं आहे. भारताच्या या यशामुळे दक्षिण आशियातला शेजारी देश म्हणून आपल्याला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी दिली आहे. भारताची ही यशोगाथा संशोधनाची नवी क्षेत्रं खुली करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.