गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद ठेवा - उपमुख्यमंत्री
• महेश आनंदा लोंढे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपा व माळेगाव येथील नवीन पोलीस स्थानक इमारतीचे उद्घाटन
पुणे : पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद, समन्वय आणि सहकार्य ठेऊन काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सुपा आणि माळेगाव येथील नवीन पोलीस स्थानाकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, पोलीस उप अधीक्षक श्रीकांत पाडुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, माळेगाव न.प.च्या मुख्याधिकारी स्मिता काळे उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्यांचा घरांचा, वाहनांचा प्रश्न मार्गी लावण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातील वाहनांकरीता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. बारामती शहरासाठी सीसीटिव्ही कॅमेरे मंजूर करण्यात आले आहे. येत्या काळात पोलीस अधीक्षक ग्रामीणच्या नवीन कार्यालयाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
बारामती तालुक्यात सार्वजनिक सण, उत्सव, जयंती व पुण्यतिथी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करण्याची परंपरा आहे. सुपा आणि माळेगाव येथील नवीन पोलीस स्थानकांच्या इमारतीमधून पोलिसांनी अतिशय चांगले काम करावे. या परिसरातील गैरप्रकारांना आळा घालून अवैध धंदे बंद करावे. समाजात पोलिसांचा आदरयुक्त दबदबा असणे गरजेचे असून पोलिसांनीही परिसरात कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण राखण्यासाठी चांगली कामगिरी करण्यावर भर द्यावा.
तालुक्यात वेगवेगळ्या जाती, धर्माचे लोक राहतात. त्यामुळे एखाद्या विशिष्ट घटकांवर विनाकारण अन्याय होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. पोलीस स्थानकात येणाऱ्या महिलांच्या अडीअडचणीची योग्य पद्धतीने दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. नागरिकांनीदेखील कायदा व नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.
विकासाच्या बाबतीत तालुका राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करुया राज्याचा सर्वांगीण विकास करतांना पुणे जिल्ह्यासह बारामती तालुका मागे राहणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. परिसरात विविध पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकास करतांना सर्वांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येत आहे. विकासाच्या बाबतीत बारामती तालुका राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया, येत्या काळात बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली
नवनिर्मित पोलीस स्थानकांविषयी.. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत असलेल्या वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकाचे विभाजन करून नवीन सुपा पोलीस स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. सुपा पोलीस स्थानकाच्या हद्दीत एकूण २४ गावे आहेत. या पोलीस स्थानकासाठी एकूण ५५ पदे मंजूर करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत असलेल्या बारामती तालुका पोलीस स्थानक व वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकाचे विभाजन करून नवीन माळेगाव पोलीस स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. माळेगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत एकूण २३ गावे आहेत. या पोलीस स्थानकासाठी एकूण ८० पदे मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व ४४ पोलिस अंमलदार सध्या कार्यरत आहेत.
आयआय केअर फांऊडेशनच्यावतीने संगणक संचाचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आयआय केअर फांऊडेशनच्यावतीने डिजिटल सेतू प्रकल्पाअंतर्गत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालयासाठी ५० लाख रुपयांचे १२५ संगणक संचाचे वितरण करण्यात आले. आयआय केअर फांऊडेशनच्यावतीने आरोग्य क्षेत्रासाठी बेड, वैद्यकीय उपकरणे, औषधी आदी बाबींसाठी नेहमीच मदत केली आहे, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.
यावेळी माळेगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, सुपा पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, वडगाव निंबाळकर पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सुपा ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती हिरवे, आयआय केअर फांऊडेशनच्या डिजिटल सेतू प्रकल्पाचे संचालक डॉ. संतोष भोसले आदी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.