दंगल घडवून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : दंगल घडवून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत याला जबाबदार असलेल्या कोणालाही सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. अंतिम आठवडा प्रस्तावाला ते आज उत्तर देत होते. गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे असं ते म्हणाले. लव जिहाद संदर्भात वेगवेगळ्या राज्याच्या कायद्यांचा अभ्यास केला जाईल आणि त्यातल्या सयुक्तिक तरतुदी घेऊन राज्याच्या कायद्यात बदल केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
रत्नागिरीत बारसू तेलशुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेऊनच केला जाईल असं सांगत त्यांनी या प्रकल्पाविरोधी आंदोलनावर झालेल्या मारहाणीचा आरोप फेटाळून लावला. या आंदोलकांनी न्यायालयात कोणतीही मारहाण झाली नसल्याचं सांगितलं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. काही जणांना देशाचा विकास नको आहे तेच लोक विविध प्रकल्पांना सातत्याने विरोध करत असून या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या ग्रीन पीस या सामाजिक संस्थेशी आहे अशी माहिती त्यांनी दिली. बारसू इथल्या कातळ शिल्पांचं संरक्षण करु, असं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पाला विलंब होत असल्यामुळे सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी यात गुंतवणूक करणार होती ती आता पाकिस्तानात गुंतवणूक करणार आहे असं ते म्हणाले. बारसू प्रकल्पासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात माध्यमांपुढे विरोधाची भूमिका मांडली.
महानगरपालिका निवडणुकांना न्यायालयाने स्थगिती दिली असून हा विषय पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहे असं सांगत त्यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला.गृहमंत्र्यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर उत्तर देताना राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत सर्व आलबेल असल्याचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात सरकारने जनतेत आपली विश्वासार्हता गमावली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान २० गुंठे जमीन असण्याची अट शिथिल करून १० गुंठे करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली असून यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.जेष्ठ साहित्यिक आणि माजी विधानपरिषद सदस्य ना.धो.महानोर यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव संमत करुत विधान परिषदेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.