व्याज परतावा कर्ज योजनेच्या ऑनलाईन पोर्टलचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘गट कर्ज व्याज परतावा योजने’च्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.अध्यक्ष अतुल सावे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. राज्यातील इतर मागास प्रवर्गातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, स्वतःच्या उद्योग उभारणीतून समाजातील अन्य गरजू व्यक्तींनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी आणि राज्याच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री श्री.सावे यांनी केले.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.चे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर, एसडीएफसी बँकेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष प्रिती शर्मा, महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री सावे म्हणाले की, राज्यातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश असलेल्या शासन प्रमाणिकरण प्राप्त गटांना स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.या योजनेमुळे मोठया प्रमाणत रोजगार उपलब्ध होणार आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत प्रती गटास बँकेकडून जास्तीत जास्त १० लाख रुपये आणि उद्योग उभारणीकरिता बँकेमार्फत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषीसंलग्न व पारंपरिक उपक्रम तसेच लघु उत्पादन व व्यापार / विक्री संदर्भातील लघु व मध्यम उद्योग त्याचप्रमाणे सेवाक्षेत्रातील गट या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५ लाख रुपये इतक्या रक्कमेच्या मर्यादेत व्याजाची रक्कम गटाच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळाद्वारे जमा करण्यात असल्याचे ही त्यांनी सांगीतले.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे इतर मागास प्रवर्गातील उद्योजकांकरीता वैयक्तिक व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्ष पर्यंत) देखील ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, बँकेमार्फत राबविण्यात येणाच्या या योजनेंतर्गत आतापर्यंत ४ हजार २७३ लाभार्थींना महामंडळामार्फत Letter of Intent (Lol) लाभ देण्यात आला आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या अधिक माहिती व सहभागाकरिता इच्छुकांनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन योजनांचे पोर्टल या Menu वरील गट कर्ज व्याज परतावा या योजनेवर Click करुन माहिती घ्यावी, असे महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.