महसूल सप्ताहानिमित्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त ५५ गुणवंत कामगारांना प्रमाणपत्राचे वितरण

 

गुणवंत कामगारांना समाजाभिमुख भूमिका बजावण्याची संधी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांमधून जिल्ह्यातील ५५ कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या कामगारांना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नेमणुकीचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

महसूल सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह शाखेचे तहसीलदार धनंजय जाधव, गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण आदी उपस्थित होते.

देशाच्या, राज्याच्या जडणघडणीमध्ये अर्थव्यवस्थेच्या रुपाने उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्याच्या सकल राज्य उत्पादनामध्ये पुणे जिल्ह्याचा सुमारे १४ ते १५ टक्के वाटा असून यात वाहन उद्योग, उत्पादन उद्योग आदींचे मोठे योगदान आहे. उद्योगांच्या वाढीसाठी पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी गुणवंत कामगारांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार डॉ. देशमुख यांनी काढले.

आपल्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित झालेल्या कामगारांना आता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कार्यक्षेत्राबाहेर अधिक समाजाभिमुख भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. आपली गुणवत्ता समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगात आणावी, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी यावेळी केले.

राज्यात प्रथमच पुण्यात नियुक्त्या
राज्यामध्ये गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची तरतूद डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात प्रथमच पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या पुढाकाराने अशा नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.

कार्यक्रमास गुणवंत कामगार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.