शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणं हे राज्य शासनानं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात जेजुरी इथं आयोजित 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय योजना आणि विविध सेवांच्या लाभाचं प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आलं. 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील 22 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

जेजुरीच्या विकासासाठी 350 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला होता, त्यापैकी 109 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू होत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. या विकास कामांच्या माध्यमातून भाविकांसाठी आगामी काळात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असं ते म्हणाले. पुण्याला नवीन विमानतळाची आवश्यकता असून पुण्याच्या विकासासाठी या नवीन विमानतळाचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. 

राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचं सहकार्य मिळत असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जमिनीची आवश्यकता असते; या विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. 

या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने काल पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. यात नोंदणी केलेल्या 1029 उमेदवारांपैकी 639 उमेदवारांची रोजगारासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या 3 उमेदवारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं.