स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत तिरंगा बाईक यात्रेचं आयोजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सकाळी तिरंगा बाईक रॅलीला झेंडा दाखवून रवाना केलं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यावेळी उपस्थित होते. या स्वातंत्र्यदिनपूर्व रॅलीमध्ये सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी, माहिती आणि प्रसारण तसंच क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर, कृषी राज्यमंत्री शोभा करंदाळजे, उर्जा आणि अवजड उद्योग मंत्री तसंच अनेक खासदार सहभागी झाले. या तिरंगा रॅलीचा समारोप मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झाला. आझादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत देशभर हर घर तिरंगा हे अभियान साजरे होणार आहे. यामध्ये नागरिकांना त्यांच्या घरावर तिरंगा फडकवण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. गेल्यावर्षी या अभियानात कोट्यवधी नागरिकांनी घरावर तिरंगा फडकावला आणि सहा कोटींनी सेल्फी काढून समाजमाध्यमांवर टाकले होते.