२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं इस्रोच्या वैज्ञानिकांना संबोधित करताना बोलत होते. भारत चंद्रावर पोहोचला असून विक्रमच्या अवतरण बिंदूचं नामकरण  ‘शिवशक्ती’ असं करण्यात येईल असं ते म्हणाले. याआधी चांद्रयान-दोनचा लॅण्डर ज्याठिकाणी कोसळला होता त्या बिंदूचं नामकरण “तिरंगा बिंदू’ केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अपयश हा शेवट नसून कठोर परिश्रम करत भविष्यात यशस्वी होण्याचा धडा घेण्याची आठवण ‘तिरंगा बिंदू’ आपल्याला करून देत राहील असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

यातून भावी पिढ्यांना मानवतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध राहण्याची प्रेरणा मिळेल असं त्यांनी सांगितलं. २३ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणाही मोदी यांनी यावेळी केली. चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशामुळे भारताला अभिमान वाटत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्याचं ते म्हणाले. भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या कामगिरीसाठी वैज्ञानिकांचं समर्पण आणि जिद्द खरोखरच प्रेरणास्थानी असल्याचं ते म्हणाले. त्याआधी  हल विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांनी “जय जवान, जय किसान, जय विज्ञान” चा नारा देऊन उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केलं. इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी उत्सुक असल्यानेच त्यांचं अभिनंदन करण्यासाठी परदेश दौऱ्यावरून आपण थेट इथे दाखल झालो असं ते म्हणाले. विज्ञान, भवितव्य आणि मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्वांनाच इस्रोच्या या यशाने अत्यानंद झाल्याचं ते म्हणाले.  भारताच्या अंतराळातल्या यशाबद्दल त्यांनी सर्वांसह बंगळुरूच्या नागरिकांचेही आभार मानले आहेत.