जपानमधल्या उद्योगाकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा मोठा वाटा राज्यात आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातल्या वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो-११, तसंच मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासहीत अनेक प्रकल्पांना सहकार्य करण्याबात जपाननं सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. जपानचा सहा दिवसांचा दौरा आटोपून फडनवीस आज मुंबईत परतले, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. याबाबत केंद्र सरकारची मंजुरी मिळल्यावर पुढची कार्यवाही केली जाईल असं त्यांनी सांगीतलं.

या दौऱ्यात एनटीटी, सोनी, जायका, जेट्रो यांसारख्या जपानी उद्योगसमुहांसोबत आपण चर्चा केली. एनटीटीनं आपली गुंतवणूक दुप्पट करण्याची, तर सोनी कंपनीनं गुंतवणूकीची तयारी दर्शवली आहे. तिथल्या अनेक उद्योगसमुहांना चीनपेक्षा भारतात गुंतवणूक करणं सुरक्षीत वाटत आहे, त्यांच्याकडून होणाऱ्या गुंतवणूकीचा मोठा वाटा राज्यात यावा यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं ते म्हणाले.

या दौऱ्यात आपण विविध प्रांतांच्या गव्हर्नर्सच्या भेटी घेतल्या, ते गुंतवणूकदारांचे शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्रात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यात मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं जपानी भाषा बोलता येणाऱ्या लोकांचा समावेश असलेलं विशेष पथक तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान जपानचा दौरा आटोपून मुंबईत परतल्यावर फडनवीस यांचं, मंत्री दीपक केसरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, कृपाशंकर सिंग आणि भाजपाच्या इतर नेते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्स्फुर्त स्वागत केलं गेलं.