भारतीय नौदलाकडून 6500 हून अधिक सहभागींसह दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन

 

मुंबई : भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडने रविवारी, 06 ऑगस्ट 2023 रोजी बहुप्रतीक्षित दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पश्चिम नौदल कमांड (एफओसी-इन-सी (पश्चिम) चे अतिविशिष्ट सेवा पदक, नौसेना पदक प्राप्त, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी 10 किमी वरुण रनला हिरवा झेंडा दाखवला. 5 किमी समुद्र रनला विशिष्ट सेवा पदक प्राप्त फ्लॅग ऑफिसर डिफेन्स अॅडव्हायझरी ग्रुप (एफओडीएजी) रिअर अॅडमिरल एव्ही भावे यांनी हिरवा झेंडा दाखवला. पश्चिमी नौदल कमांडने प्रमुख रेस मॅनेजमेंट पार्टनर मेसर्स फिटपेजसह हा कार्यक्रम फोर्ट येथील बॅलार्ड पिअर येथे आयोजित केला होता. 

उत्साह आणि अपेक्षेसह, सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीतील 6,500 धावपटूंनी या शर्यतीत सहभाग घेतला. आमच्या सांस्कृतिक वारशाच्या चिरस्थायी आकर्षणाचा आणि निरोगी जीवनशैलीच्या उत्कटतेचा दाखला असलेल्या, या स्पर्धेत शहरभरातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

स्वयंसेवकांचा पाठिंबा आणि मुंबई पोलीस आणि  बीएमसी च्या सक्रिय योगदानामुळे हेरिटेज रन 2023 ला अभूतपूर्व यश मिळाले. 

10 किमी धावण्याच्या शर्यतीसाठी तीन वयोगट होते; जसे 60 वर्षे आणि त्यावरील वयोगट, 45 ते 59 वर्षे वयोगट आणि 16 ते 44 वर्षे वयोगट. 5 किमी धावण्याच्या शर्यतीसाठी तीन वयोगट होते जसे कि - 60 वर्षे आणि त्यावरील वयोगट, 18 ते 59 वर्षे वयोगट आणि 12 ते 17 वर्षे वयोगट. 10 किमी शर्यतीचे पुरुष विजेते (16-44 वर्षे वयोगट) श्रीमंत कोल्हे आणि 10 किमी शर्यतीचे पुरुष विजेते (45-59 वर्षे वयोगट) शिवंद शेट्टी यांचा फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (पश्चिम) व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 5 किमी शर्यतीचे पुरुष विजेते (12-17 वर्षे वयोगट) विकास कुमार निर्मल आणि 10 किमी पुरुष विजेते (वय 60 वर्षाहून अधिक) केशव मोटे यांना एव्हीएसएम, एनएम, नौदल प्रकल्पाचे महासंचालक व्हाइस ऍडमिरल राजाराम स्वामीनाथन यांच्या हस्ते आणि 5 किमी पुरुष ((वय 60 वर्षाहून अधिक) आशुतोष रॉय आणि 5 किमी पुरुष (18-59 वर्षे वयोगट) साहिल बिबावे यांचा एव्हीएसएम, व्हीएसएम, कंट्रोलर ऑफ पर्सोनेल सर्व्हिसेस व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

10 किमी महिला (45-59 वर्षे वयोगट) अनीता बजाज आणि (16-44 वर्षे वयोगट) यामिनी ठाकरे यांचा NWWA (WR) अध्यक्ष शशी त्रिपाठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 5 किमी महिला (12-17 वर्षे वयोगट) गायत्री शिंदे आणि 10 किमी महिला (वय 60 वर्षाहून अधिक) लता अलीमचंदानी आणि 5 किमी यांचा रेणू राजाराम यांच्या हस्ते आणि महिला वर्ग (वय 60 वर्षाहून अधिक) साधना विरकर आणि (18-59 वर्षे वयोगट) उर्मिला बाने या विजेत्यांना लैला स्वामीनाथन यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. सहभागी स्पर्धकांपैकी सर्वात वयस्कर पुरुष कॅप्टन विनोद सैगल (10 किमी) आणि सुरेंद्र जोशी (5 किमी) आणि सर्वात वयस्कर महिला दक्षा दिलीप कनाविया (10 किमी) आणि धर्मी स्वामीनाथन (5 किमी) यांचा पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम (निवृत्त) व्हाइस अॅडमिरल पी मुर्गेसन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

स्पर्धेच्या सुव्यवस्थित आयोजनाबद्दल फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या भारतीय नौदलाच्या अर्ध मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचे अनावरण केले आणि मुंबईचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी डब्ल्यूएनसी च्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

निसर्गरम्य सान्निध्यात ऐतिहासिक दक्षिण मुंबई जिल्ह्यातील ही दौड म्हणजे सर्व सहभागींसाठी एकप्रकारे पारितोषिकच होते. प्राचीन स्मारकांपासून ते 288 वर्ष जुन्या नौदल डॉकयार्डसह आधुनिक स्थापत्य स्थळांना निरखत दक्षिण मुंबईचा समृद्ध ठेवा आणि वारसा अनुभवण्याची संधी याद्वारे स्पर्धकांना लाभली. 

केवळ सहभागींच्या संख्येच्या दृष्टीनेच नव्हे तर सहभागी असलेल्या प्रत्येकाने दाखवलेल्या अविश्वसनीय ऊर्जा आणि उत्साहाच्या बाबतीतही ही हेरिटेज रन अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी ठरली. क्षमतेच्या मर्यादेमुळे सुमारे 6,000 अतिरिक्त स्पर्धक नोंदणी करू शकले नाहीत या वस्तुस्थितीवरून ही स्पर्धा किती लोकप्रिय ठरली याचा अंदाज बांधता येतो.