विरोधक दिशाहीन असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची टीका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विरोधी पक्षांनी आगामी काळातही विरोधातच बसण्याची मानसिक तयारी केली आहे, हेच त्यांच्या वर्तनावरुन दिसतं, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संसद भवन संकुलात भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते. इतका दिशाहीन विरोधी पक्ष आपण कधीही पाहिला नव्हता, अशी टीका त्यांनी केली आणि २०२४ मधे पुन्हा आपलं सरकार सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचं ज्येष्ठ भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

१५ ऑगस्टला प्रत्येक विधानसभा मतदार संघात हर-घर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मोदी यांनी दिल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. दरम्यान, मणिपूर प्रश्नी चर्चा करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं, असं पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे आणि अधीररंजन चौधरी यांना पाठवलं आहे. शाह यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. सरकार याप्रश्नी चर्चेला तयार असून, सर्व पक्षांनी त्यासाठी सहकार्य करावं, असं त्यांनी म्हटलं आहे.