महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर – मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या डिडी-न्यूज वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प थांबले होते. या प्रकल्पांच्या कामांना आम्ही गती दिली आहे. हे प्रकल्प जनतेच्या सेवेत वेळेत दाखल व्हावेत, असा आमचा निर्धार आहे, असं ते म्हणाले. 

महाराष्ट्र पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकांचं राज्य आहे. यातले काही प्रकल्प हे गेम चेंजर असल्याचं मुख्यंत्र्यांनी सांगितलं. मुंबईतल्या नाले- सफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी तसंच रस्ते खड्डे-मुक्त करण्याच्या भूमिका याबाबत त्यांनी माहिती दिली. हे शहर आंतरराष्ट्रीय लौकीक असलेले शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त व्हायलाच हवी. त्यासाठी पालिका आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिलेत. पहिल्याच टप्प्यात ४५० किमीचे रस्ते काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला. आगामी एक दोन वर्षात पूर्ण मुंबई शहरातले रस्ते खड्डेमुक्त होतील, असे प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.