शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं - अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं,अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यांनी राजकारणाऐवजी समाजकारणात लक्ष घालावं, काही चुकलं तर सांगावं. असा सल्ला अजित पवार यांनी दिला. मुंबईत समर्थकांच्या बैठकीत ते बोलत होते. वरिष्ठांनी ठराविक वय झाल्यावर सेवानिवृत्ती घ्यावी यासाठी त्यांनी भाजपा, इतर राजकीय पक्ष, प्रशासन, व्यवसाय यांचं उदाहरण दिलं. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा केली. पण ते हट्टी असल्यानं काहीही ऐकत नसल्याचं कळवल्याचा दावा त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचं वातावरण देशात आहे. असं असताना आपणही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. पण तसं न करता विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. यापुढे राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि नाव आपल्याकडेच राहणार असल्याचं ते म्हणाले. या बैठकीला अजित पवार यांच्या सोबत शपथ घेतलेले सर्व मंत्री, प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक निंबाळकर वगैरे नेते उपस्थित आहेत.

दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालच्या गटाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे, फौझिया खान, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे वगैरे नेते उपस्थित आहेत. दोन्ही गटांकडे नेमके किती आमदार आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी तसंच नेतृत्वाची ताकद दाखवण्यासाठी या बैठका महत्वाच्या मानल्या जात आहेत. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार आहेत. पक्षांतर बंदीची कारवाई टाळण्यासाठी अजित पवार यांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. अजित पवार यांनी आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर अजित पवार यांच्यासह सरकारमध्ये सामील झालेल्या केवळ ९ आमदारांचाच त्यांना पाठिंबा असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या जवळपास सर्व आमदारांचा पाठिंबा आमच्या कडे असल्याच प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं.