इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

अलिबाग : इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे  दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नढळ येथे दुर्घटनेतील पीडितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांनी पालकत्व स्वीकारल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी आमदार मनीषा कायंदे, आमदार महेंद्र थोरवे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

या मुलांशी संवाद साधताना डॉ.गोऱ्हे यांनी मुलांना लगेच कामाला न जाता शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले. काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याकरिता स्वतःचा नंबर अनाथ मुलांना दिला. तसेच गावातील स्थानिक व्यक्ती ज्याला आपण सर्व ओळखता त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी मुलांना केली.

दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडी मध्ये एकूण 1 ते 18 वयापर्यंतचे 31 मुल- मुले असून त्यापैकी 21 जण आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने या इरशाळवाडी दुर्घटनेतील या अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारले आहे. ही मुले 18 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी संस्थेने घेतली असून त्यांच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही स्वयंसेवी आहे  खा.डॉ.शिंदे यांनी यावेळी दूरध्वनीद्वारे संबंधितांशी संवाद साधला. स्वतः मुख्यमंत्री  या संपूर्ण घटनेवर आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत मदत कार्य सुरू राहील, असा विश्वास यावेळी दुर्घटनाग्रस्त मुलांना देण्यात आला. तसेच मदत साहित्याचे वितरण करण्यात आले. आमदार मनीषा  कायंदे व स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना देखील यावेळी मुलांशी संवाद साधला.

राज्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे साहेब यांनी यापूर्वी देखील 2020 साली महाड येथील तारीक गार्डन या दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावलेल्या दोन लहान बालकांचे संपूर्णता पालकत्व स्वीकारले होते. तसेच 2021 साली पालघर येथे रोजगाराअभावी आत्महत्या केलेल्या कामगार दाम्पत्यांच्या 2 मुलांचे होते.