ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन

 

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. पुण्याजवळील आंबी परिसरात राहत्या घरी पोलिसांना काल त्यांचा मृतदेह आढळला असून गेले 2 दिवस त्यांच्या घराचं दार बंद असल्यानं पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे.

रविंद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला. व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या 1975 मधील मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले. महाजनी यांनी 1997 यावर्षी - सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. ज्येष्ठ अभिनेता रवींद्र महाजनी यांचं निधन/ अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं तीव्र दुःख up

आपल्या कसदार अभिनयाचा अमिट ठसा मराठी सिनेसृष्टीवर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी चित्रपट रसिकांच्या मनांत कायम अजरामर राहतील अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.' रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला. रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुबाबदार अभिनेता हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. रवींद्र महाजनी यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. त्यांच्या निधनाने एक देखणा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.