भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न ६ पूर्णांक १ दशांश टक्क्यांवर जाण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चालू आर्थिक वर्षात भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न ६ पूर्णांक १ दशांश टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात प्रकाशित झालेल्या नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालात ही वाढ ५ पूर्णांक ९ दशांश टक्के राहील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. काल प्रकाशित झालेल्या ताज्या अहवालात ही वाढ २ दशांश टक्क्यांनी वाढेल, असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. स्थानिक गुंतवणुकीत झालेल्या वृद्धीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या त्रैमासिकात ही वाढ दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सकल देशांतर्गत उत्पन्न ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील, असा अंदाज नाणेनिधीनं वर्तवला आहे. २०२३ मध्ये अपेक्षित ५ पूर्णांक २ दशांश टक्के आणि २०२४ मध्ये ४ पूर्णांक ५ दशांश टक्के वाढीसह सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मानही भारत आणि चीननं पटकावला आहे.