मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या स्वातंत्र्यसेनानींना आणि हुतात्म्यांना अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत एकमतानं मंजूर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्याला ‘मागास’ या शब्दापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करत असून, या विभागात विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, या संग्रामातल्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना आणि हुतात्म्यांना, अभिवादन करण्याचा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत मांडला, त्यावेळी ते बोलत होते. हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला. मुक्ती संग्रामाचे कार्यक्रम मराठवाड्यात उत्साहाने साजरे केले जाणार असून, यासाठी चार कोटी रुपये दिले जाणार आहेत, तसंच जिल्हा नियोजनामधून प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये निधी दिला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्ती संग्रामाचं स्मृतिस्मारक उभारण्यात येणार असून, त्यासाठी १०० कोटी रुपये निधीला मंजुरी दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गेल्या वर्षभरात उद्योग, विकास, सिंचन आणि कृषी या क्षेत्रात विकासाच्या वाटा खुल्या झाल्या, आणि खऱ्या अर्थानं मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करता आलं, असं ते म्हणाले. मुक्ती संग्रामाच्या अमृत वर्षानिमित्त सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

मराठवाड्यातले अशोक चव्हाण, प्रकाश सोळंके, राणा जगजीतसिंह पाटील, कैलास पाटील, अभिमन्यू पवार, ज्ञानराज चौगुले यांच्यासह अनेक आमदारांनी, या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेत, विविध मागण्यांकडे सदनाचं लक्ष वेधलं. यामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष दूर करावा, दुष्काळाच्या समस्येचं कायमस्वरुपी निवारण करावं, मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला गती द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. 

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image