आठवडे बाजारात शिबीरांचे आयोजन करुन जात पडताळणीसाठीचे अर्ज भरुन घ्या

 

समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बार्टीला सूचना

पुणे : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने बार्टीने राज्यातील आठवडी बाजारात जात पडताळणीचे अर्ज भरून घेण्यासाठी शिबिरे आयोजित करावीत, अशा सूचना राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केल्या.

समाज कल्याण आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. बकोरिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेस भेट देऊन कामकाज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, स्नेहल भोसले, अनिल कारंडे, आरती भोसले, रवींद्र कदम, वृषाली शिंदे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्री. बकोरिया म्हणाले, समाज कल्याण विभाग व बार्टी सयुक्तपणे अनुसूचित जातीच्या कल्याणार्थ कार्य करत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याच्यादृष्टीने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांच्या तयारीसाठी तसेच कौशल्य विभागामार्फत दर्जेदार पद्धतीचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. बार्टी संस्थेचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे असे सांगून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर समाज कल्याण विभाग व बार्टीने एकत्रितपणे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समाज कल्याण आयुक्तांच्या निर्देशानुसार अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र जलद गतीने मिळण्यासाठी राज्यातील आठवडी बाजारात शिबिरांचे आयोजन करण्यात येईल आणि जात पडताळणीची कामे निकाली काढण्यात येतील, असे श्री. वारे यांनी यावेळी सांगितले.

प्रस्ताविकात डॉ. चव्हाण म्हणाले, समाज कल्याण विभाग व बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकचे प्रयत्न केले जातील.