ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं आज पहाटे साडे पाच वाजता पुण्यात निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. दीर्घ काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते.  मात्र त्यांना अखेर आज मृत्यूनं  गाठलं. त्यांच्या जाण्यानं एक मराठी गणितज्ज्ञ तर हरपलाच, पण त्याशिवाय आपण एक लेखिका, शिक्षिका, विज्ञाननिष्ठ विचारवंत आणि संशोधकही गमावला असल्याच्या  भावना व्यक्त होत आहेत.

पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांनी १९६२ मध्ये मुंबई विद्यापीठातून गणित विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादन केली होती. त्यात विद्यापीठाचं सुवर्णपदक त्यांनी मिळवलं होतं.

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. डॉ. मंगला नारळीकर यांची अध्यापकीय कारकीर्द  मोठी आहे. मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च सह  त्यांनी केंब्रिज विद्यापीठात  आणि  पुणे विद्यापीठातही अध्यापन आणि संशोधनाची जबाबदारी पार पाडली. विद्यार्थ्यांच्या मनातली गणिताविषयीची भीती घालवण्यासाठी तसंच गणिताची गोडी लावण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केलं होतं.