राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या बैठकांना वेग

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील बदलत्या नव्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्ली इथं बोलावली आहे. 

काँग्रेसचा कोणताही आमदार पक्ष सोडून जाणार नाही. भाजपा जाणूनबुजून संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केला. राज्यातली महागाई, बेरोजगारी, पेरणी यासारख्या महत्त्वाच्या समस्यांवरुन लक्ष वळण्यासाठी हे सुरू आहे. जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. बुलडाणामधल्या अपघातातल्या मृतांवर अंत्यसंस्कार सुरू असताना इकडे राजभवनावर शपथविधी सुरू होता, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचं पक्षातर्फे अभिनंदन केलं. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं महायुती सोबत अजित पवार आल्यामुळं महायुतीची ताकद अधिक वाढली असल्याचं त्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. आपल्या पक्षाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी आपण पवार यांच्याशी चर्चा केल्याचं आठवले म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांनी - पक्षावर आपला अधिकार सांगत काल मुंबईत बैठकां घेतल्या. अजित पवार यांच्या गटाच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते यांच्यासह ३५ आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. तर शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह विधानसभा तसंच विधानपरिषदेचे मिळून १६ आमदार, ५ खासदार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार असून पक्षांतर बंदीची कारवाई टाळण्यासाठी अजित पवार यांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं ४० आमदारांच्या पाठींब्याचं पत्र सादर करत पक्षाचं चिन्ह आणि नावावर दावा करणारी याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करत नऊ आमदारांवर - निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.