कारगिल विजय दिनानिमित्त देशाची शहीदांना आदरांजली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी कारगिल विजय दिवसानिमित्तानं लष्कर आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. देशासाठी शहीद झालेल्या जवानांनी दाखवलेला पराक्रम भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात नमूद केलं आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील विजय दिवसानिमित्तानं देशासाठी शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचं धैर्याचं कौतुक करत त्यांचा पराक्रम प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी शहीदांना आदरांजली वाहत त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. 

याच दिवशी भारतीय सैन्यानं १९९९ मध्ये साठ दिवसांच्या युद्धानंतर कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला होता. या युद्धात प्राणांचं बलिदान देणाऱ्या आणि पराक्रम गाजवणाऱ्या शूर सैनिकांना आज देश आदरांजली वाहत आहे.  या दिवसाची आठवण म्हणून कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्याचा मुख्य कार्यक्रम द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, तीन दलांचे प्रमुख, लडाखचे उप राज्यपाल सेवानिवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा उपस्थित होते. यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असून त्यासाठी कोणतंही पाऊल उचलण्याची सरकारची तयारी असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. भविष्यात भारतीय सशस्त्र दलांपुढे अनेक कठीण आव्हानं आहेत. त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपण तयार असणं आवश्यक असल्याचं मत लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी व्यक्त केलं.केंद्रीय मंत्रिमंडळाने बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयकाला  आज लोकसभेत चर्चेनंतर  मंजुरी मिळाली. बहुराज्य सहकारी संस्थांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि नफा वाढवण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडलं  आहे,  असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी  या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले.

कारगिल विजय दिवसानिमित्त मुंबईतील कुलाबा इथल्या शहीद स्मारकातही पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धात शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी  लेफ्टनंट जनरल एच के कोहलम, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागाचे अॅडमिरल संजय भल्ला, पश्चिम नौदल विभागाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद, तसंच तिन्ही सेवेतील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. वाशिम इथंही कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सैनिक कल्याण विभाग आणि आजी माजी सैनिकांच्यावतीनं केमिस्ट भवन इथं शहिद सैनिकांना पुष्पचक्र वाहून  आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कारगिल युद्धात सहभागी झालेल्या योद्ध्यांचा तसंच अलिकडेच लष्कारातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात वीरपत्नी वैशाली अमोल गोरे यांनाही सन्मानित केलं.