विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांना अपात्र ठरवावं अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विधान परिषद सचिवांना विरोधकांनी अपात्रतेची नोटीस दिली असल्याची माहिती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. ते विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वीच गोऱ्हे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे, त्यांना उपसभापती पदावरून हटवावं, अशी मागणी केल्याचं दानवे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दानवे अल्पमतात आले आहेत. त्यामुळे त्यांनाच या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं ते वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.सरकार आणि विधान परिषदेच्या उपसभापती विरोधी पक्षांविरोधात दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत,

नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती पदी राहून कामकाज करणे हे असंवैधानिक आहे. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी महविकास आघाडीने केली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की,विधान सभेतील विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. सध्याचं राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा करू देत नाही. हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.काँग्रेसच्या आमदारांनी आज सरकारविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालच्यी विरोधी पक्षातल्या एका शिष्टमंडळानं आज राज्यपाल रमेश बैस यांची राज भवन, मुंबई इथं भेट घेऊन राज्यपालांना निवेदन सादर केले.