राज्यात तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाच्या सत्ताकारणामुळे राज्यातलं राजकीय वातावरण गढूळ झालं असून शासन आणि प्रशासनही ठप्प झालं असल्यानं, राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.राज्यात सध्या जे सुरु आहे ते महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यातलं सरकार अस्थिर असून हे सरकार कधी जाईल हे सांगता येत नाही. मलईदार खाती कोणाला मिळावीत यासाठी मारामारी सुरु आहे. राज्याच्या काही भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत, तर काही भागात दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करुनही ती मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, महागाई, बेरोजगारी, जनतेच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्ष बोलत नाहीत, जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं आहे. याबाबत काँग्रेस पक्ष पावसाळी अधिवेशानात सरकारला जाब विचारेल, असं पटोले म्हणाले.