मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहामधे प्रचंड गदारोळ झाल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी कामकाजात अडथळे येत आहेत. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 

लोकसभेत कामकाज चालू झाल्यावर काँग्रेस, द्रमुक, जनता दल संयुक्त आणि इतर पक्षांच्या सदस्यांनी याप्रश्नांवरुन जोर जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. या मुद्याबाबत विरोधक गंभीर नसून त्यांनी चर्चा करायची नाही, तर केवळ गोंधळ करायचा आहे, असा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी देखील विरोधकांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. 

सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. मात्र गदारोळ चालूच राहिला, त्यामुळे त्यांनी कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केलं. १२ नंतरही सभागृह भरल्यावर घोषणाबाजी चालूच राहिली आणि सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. 

राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सुरुवातीलाच कामकाज समितीच्या निर्णयांनुसार चर्चेच्या निर्धारित वेळा जाहीर केल्या. त्यात दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकाचा समावेश होता. हे विधेयक असंवैधानिक असल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीचे संजय सिंग यांनी विधेयक मांडण्याला जोरदार हरकत दिली. यावर वाद चालू असतानाच काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

सभागृहात यासंदर्भात झालेल्या चर्चेमधला काही भाग नोंदीतून वगळला गेल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे डिरेक ओब्रायन यांनी आक्षेप घेतला. त्यापाठोपाठ काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, द्रमुक, डावे पक्ष आणि इतरांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. सत्ताधारी सदस्यांनीही प्रतिघोषणा दिल्या. अध्यक्ष धनखड यांनी वारंवार सांगूनही गदारोळ चालूच राहिला अखेर अडीच वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.