आषाढी यात्रेत सहभागी वारकर्‍यांना उष्माघात आणि उन्हाचा त्रास होवू नये यासाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी यात्रेत सहभागी वारकर्‍यांना उष्माघात आणि उन्हाचा त्रास होवू नये यासाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. यात्राकाळात वारकर्‍यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये तसंच औषधोपचाराबरोबर स्वच्छता आणि इतर आवश्यक गोष्टी तातडीनं उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

आषाढी वारीत पालखी सोहळ्याबरोबर तसंच पायी चालत येणार्‍या वारकर्‍यांची संख्या मोठी असून सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशादरम्यान आहे. वारकर्‍यांना साध्या टँकरमधून थंड पाणी देणे शक्य होत नाही.

त्यामुळे विविध दूध संघाकडे असणार्‍या चिलिंग प्लॅन्ट मधून हे पाणी थंड करण्यात येणार आहे. दूध संघाकडील टँकरच्या माध्यमातूनच थंड पाणी पुरवठा करणार असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे.