योग हे जीवनाचं सूत्र, जीवनपद्धती म्हणून सर्वांनी स्विकारली तर विश्वात शांतता नांदेल - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग ही जीवन पद्धती अंगिकारली तर जगात शांतता नांदेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात १८० देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, योग ही भारताची प्राचीन अशी संस्कृती आहे. ही संस्कृती जगभर जावी या उद्देशानं नऊ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाला जागतिक योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव भारतानं मांडला होता. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत २१ जून हा दिवस जागतिक योगदिवस म्हणून जाहीर केला. त्यानंतर सलग नऊ वर्षे हा दिवस संपूर्ण जगामध्ये उत्साहात साजरा केला जात असल्याचा आनंद वाटतो. 

योग म्हणजे एकत्र येणं. या योगामुळे संपूर्ण जग एकत्र आल्याचं समाधान वाटत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तसंच योगावर कुणाची मालकी हक्क नाही, कुणाचंही स्वामित्व नाही. लिंगभेदविरहीत असून तो सर्वांसाठी आहे. आपल्या भाषणात मोदी यांनी योगाचं महत्त्व विषद केलं. ते म्हणाले की, योगा नियमित केल्यामुळे माणसाच्या आयुष्यात स्थैर्य येतं. हे स्थैर्य केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक देखील असतं. योग जीवनपद्धती असून ती सर्वांनी अंगिकारली तर विश्वातही शांतता नांदेल आणि प्रत्येकजण सुखी-समाधानी होईल, असं आवाहनही त्यांनी केलं. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघ कार्यालयाच्या आवारातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याला आदरांजली वाहिली.