'महाभारत' या दूरदर्शन मालिकेत 'शकुनी मामा' साकारणारे गुफी पेंटल यांचं निधन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दूरदर्शनच्या 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत 'शकुनी मामा'ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं मूळ नाव सरबजीत सिंह पेंटल होतं. १९७५ मध्ये 'रफू चक्कर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ८० च्या दशकात अनेक चित्रपट आणि मालिकांमधे त्यांनी काम केलं. पण त्यांना खरी ओळख, १९८८ मध्ये बी.आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' या मालिकेतून मिळाली. महाभारत मालिकेचे कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. स्टार भारतच्या 'जय कन्हैया लाल की' शोमध्ये ते शेवटचे दिसले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. दरम्यान त्यांना बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.