अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावरुन परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी तसंच अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमेरिका आणि इजिप्तचा दौरा आटोपून मोदी नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर ही बैठक त्यांनी घेतली. 

भारत आणि अमेरिका या दोन देशांची मैत्री  ही एक जागतिक हित साधणारी शक्ती आहे आणि अवघ्या जगाच्या  उत्तम आणि शाश्वत विकासासाठी ही शक्ती कार्य करेल,असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलेल्या ट्विट ला उत्तर देताना व्यक्त केला.

बायडन यांनी आपल्या ट्विट संदेशात ,उभय देशांतले  मैत्रीसंबंध हे जगातले सर्वात परिणामकारक मैत्री संबंध आहेत आणि  आता ते पूर्वीपेक्षा अधिक दृढ आणि गतिमान झाले आहेत, असं म्हटलं होतं.

आणखी एका ट्विटमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी इजिप्तचा दौरा हा ऐतिहासिक होता, त्यामुळे भारत आणि इजिप्त या दोन्ही देशांमधल्या संबंधांमध्ये दृढता आणि नाविन्य येईल आणि दोन्ही देशांच्या जनतेला त्याचा फायदा होईल, असा  विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी,  इजिप्त सरकार आणि तिथल्या  जनतेच्या प्रेमाबद्दल मोदी यांनी आभार मानले.