आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतचा एकत्रित सराव

 

अवकाशाला गवसणी : भारतीय नौदलाच्या बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे प्रदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हिंद  महासागर - भारतीय नौदलाने आज बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे आणि अरबी समुद्रात 35 हून अधिक विमानांच्या समन्वित तैनातीसह आपल्या प्रचंड सागरी सामर्थ्याचे  दर्शन घडवले. नौदलाच्या सामर्थ्याचे  हे प्रदर्शन भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण, प्रादेशिक स्थैर्य राखण्यासाठी आणि सागरी क्षेत्रामध्ये सहकारी भागीदारी वाढवण्याची कटिबद्धता अधोरेखित करते.

हिंद महासागरात आणि त्यापलीकडे सागरी सुरक्षा आणि उर्जा-प्रक्षेपण वाढवण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांमध्ये हा एक  महत्त्वपूर्ण टप्पा देखील आहे. या सरावामध्ये  आयएनएस  विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या आयएनएस  विक्रांत या दोन विमानवाहू युद्धनौकां सोबतच विविध जहाजे, पाणबुड्या आणि विमाने यांचा समावेश होता या माध्यमातून  सागरी क्षेत्रात भारताचे तांत्रिक कौशल्य प्रदर्शित झाले.

आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत यांच्या सरावाचा  केंद्रबिंदू हा 'तरंगणारे  सार्वभौम  हवाई तळ ' म्हणून सेवा देण्यासह मिग-29 के लढाऊ विमाने, एमएच 60आर, कामोव, सी किंग, चेतक आणि एएलएच हेलिकॉप्टर विमानांच्या विस्तृत श्रेणीसाठी प्रक्षेपण मंच प्रदान करण्यावर होता. हे फिरते तळ कुठेही ठेवले जाऊ शकतात, यामुळे लवचिकता वाढेल, उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांना वेळेवर प्रतिसाद देता येईल आणि जगभरातील आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी शाश्वत हवाई मोहिमा राबवण्यात येतील. याव्यतिरिक्त, आपल्या मित्रराष्ट्रांना आश्वस्त करते की,   भारतीय नौदल या प्रदेशातील आपल्या 'सामूहिक' सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आणि सज्ज आहे.

दोन विमानवाहू युद्धनौकांचा  यशस्वी सराव हा सागरी प्राबल्य राखण्यासाठी समुद्र-आधारित हवाई सामर्थ्याच्या  महत्त्वपूर्ण योगदानाचे एक शक्तिशाली प्रमाण आहे. भारत आपली सुरक्षा यंत्रणा बळकट  करत असल्याने, देशाच्या संरक्षण धोरणाला आकार देण्यासाठी आणि प्रादेशिक स्थैर्याला चालना देण्यासाठी विमानवाहू जहाजांचे महत्त्व सर्वोपरी राहील.