आकाशवाणीसाठी वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पत्रकारिता किंवा जन संज्ञापनातील पदव्युत्तर पदविका किंवा पदवी प्राप्त केलेले अथवा मान्यताप्राप्त पदवी आणि किमान दोन वर्षांचा अनुभव असलेले २४ ते ४५ वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासोबतच उमेदवारांना संगणक वापराचं आणि वर्ड प्रोसेसिंगचं मूलभूत ज्ञान असणं आवश्यक असेल. या पदासाठी इच्छुक उमेदवार संबंधित जिल्हा मुख्यालय किंवा पालिकेच्या हद्दीपासून १० किलो मिटरच्या परिघात वास्तव्याला असायला हवेत, आणि त्यांच्याकडे वृत्त संकलनासाठी आवश्यक स्वतःची सामग्री असायला हवी. याअंतर्गत होणाऱ्या नियुक्तीसाठी दृक श्राव्य माध्यमासाठी वृत्तांकन आणि चित्रीकरण करण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल. ही नियुक्ती अटी आणि शर्तींवर लागू असेल.यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती prasarbharati.gov.in/pbvacancies या link वर उपलब्ध आहे. तुम्ही सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करत असाल, आणि आकाशवाणीसाठी वार्तांकन करण्याची इच्छा असेल, तर वेळ न दवडता अर्ज करा, आणि airnewspanel2022@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवून द्या.