नागरिकांनी २ हजार रुपये मूल्याच्या, सुमारे ५० टक्के नोटा बँकेत जमा केल्या किंवा बदलून घेतल्या असल्याची शक्तीकांत दास यांची माहिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी २ हजार रुपये मूल्याच्या, सुमारे ५० टक्के नोटा बँकेत जमा केल्या किंवा बदलून घेतल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वार्ताहर परिषदेत दिली. सुमारे ३ लाख ६२ हजार कोटी नोटा चलनात होत्या, त्यापैकी १ लाख  ८० हजार कोटी नोटा ग्राहकांनी जमा केल्या किंवा बदलून घेतल्या आहेत. यात बँकेत जमा झालेल्या नोटांचं प्रमाण ८५ टक्के आहे, असं त्यांनी सांगितलं. नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी बँकामधे गर्दी होत नाही, मात्र या अदलबदलीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नये, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. 

नव्या मूल्याच्या नोटा सुरु करण्याचा बँकेचा विचार नसल्याचं दास यांनी स्पष्ट केलं. रिझर्व्ह बँकेचं डिजीटल चलन सुरु करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, असं रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर रबिशंकर यांनी यावेळे सांगितलं. याबाबत, पथदर्शी प्रकल्पातंर्गत जूनअखेपर्यंत १० लाख ग्राहकांबरोबर चाचणी होणं अपेक्षित आहे, असं ते म्हणाले.